परवानगी फांद्या छाटण्याची महाशयांनी झाड मुळासकट उखडले!

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या पश्चिमेस सुमारे १०० मीटर अंतरावर शिवराजनगर सहकारी रहिवासी संस्था आहे. या संस्थेच्या आवारात एकूण पंधरा रो हाऊसेस आहेत. सदर रहिवासी संस्थेचा डीम कन्व्हेन्स झालेला आहे. सदर रहिवासी संस्थेच्या अल्मेडा रोडवरील रो हाऊस क्रमांक ११ हे राम मूर्ती यांच्या मालकीचे असून ते संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी त्यांचे रो हाऊस सुशील सिंह यांना नुकतेच हस्तांतरीत केले असल्याची माहिती आहे. संस्थेच्या नियमांप्रमाणे राम मर्ती यांनी संस्थेला व्यवहाराची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, सदर व्यवहाराची राम मूर्ती यांच्याकडून संस्थेला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या दप्तरी हाऊस क्रमांक ११ चे मालक हे राम मूर्तीच आहेत. आजच्या तारखेलाही राम मूर्तीच संस्थेचे सदस्य आहेत. राम मूर्ती वास्तव्याला असल्यापासून सदर रो हाऊसपासून काही फुट अंतरावर फणसाचे मोठे झाड होते. मूर्ती यांना वास्तव्यास असण्याच्या कालावधीत कधीही सदर झाडाचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र, वास्तव्यास येण्याअगोदरच सुशील सिंह यांना सदर झाडाचा प्रचंड त्रास जाणवला. त्यांनी तत्काळ २६ नोव्हेंबर २०१९ रोजी ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधीकरणकडे झाडाच्या त्रासदायक फांद्या छाटण्याची परवानगी मागितली. वृक्षप्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनीही सुशील सिंह यांना होणारा त्रास लक्षात घेत कामातील तत्परता दाखवीत अर्ज दाखल केल्याच्या सातव्या दिवशीच म्हणजे २ डिसेंबर २०१९ रोजी त्रासदायक आणि धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी दिली. परवानगी मिळताच सिंह यांनी ११ डिसेंबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळी मजुरांकरवी झाडाच्या प्रथम काही फांद्या छाटल्या. त्यानंतर २२ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण फांद्या छाटून केवळ मुख्य खोडच शिल्लक ठेवले. त्यानंतर संधीचा फायदा घेत सिंह यांनी २५ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण झाडच बुध्यातूनच कापले. झाड कापल्याचे लक्षात येताच याबाबत संस्थेने तक्रार केल्यानंतर वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता भेट देऊन पाहणी केली. त्याच क्षणी त्यांनी पंचनामा करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी भेट दिली तेव्हा पंचनामा केलाच नाही. त्यानंतर रजेवर जाऊन आल्यानंतर सबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला खरा मात्र तो पोलिसांकडे न जाता वृक्ष प्राधिकरणच्या दप्तरीच पडून असल्याची माहिती आहे. ठाणे महापालिकेने सिंह यांना केवळ त्रासदायक आणि धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. मात्र, सिंह यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी जेसीबीने झाडच मुळासकट उखडून टाकत त्याठिकाणी कोबा करून घेतला आहे. सदरची जागा दुचाकी विक्रीसाठी ठेवण्यासाठी वापरण्याचा सिंह याचा मानस असल्याची माहिती आहे..


डीम कन्व्हेन्स झाल्याने सर्व रो हाऊसेस संस्थेच्या मालकीची आहेत. त्यामुळे रो हाऊसमध्ये कोणत्याही प्रकारचे काम करताना सबंधित भोगवटादाराला संस्थेची परवानगी बंधनकारक तर आहेच, सोबतच ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाची परवानगी घेणेही बंधनकारक आहे. ___ मात्र, राम मूर्ती यांचे रो हाऊस विकत घेतल्याचा दावा करणाऱ्या सुशील सिंह यांनी रहिवाशी संस्थेचे सदस्य नसताना, संस्थेकडे कोणतीही चौकशी न करता आणि ठाणे महापालिकेची परवानगी न घेता मजुरांकरवी मूळ बांधकामात बदल केले आहेत. निवासी स्वरूपाच्या रो हाऊसच्या आवारात सुशील सिंह यांनी मजुरांकरवी व्यापारी उपयोगासाठी साधारणपणे पाचशे स्क्वेअर फूट आकाराच्या नियमबाह्य शेडची उभारणी केली आहे. रस्त्याला लागून रामेश्वर बिल्डिंगच्या कंपाउंडला लागून अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात बाबा आलेले आहे. त्यासाठी धातूचे भव्य गर्डर आणि स्टीलच्या फ्रेम रो हाऊसच्या बाहेर सोसायटीच्या आवारात उभारण्यात आल्या आहेत. रो हाऊसच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबवरही मेटलची भव्य रुफ शेड पक्क्या स्वरुपात उभारण्यात आलेली आहे. सदर अनधिकृत बांधकामासंदर्भात योग्य ती कायदेशीर कार्यवाही होण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, कायदा हातात घेऊन निवासी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना-सदस्यांना त्रास देणाऱ्या सदर व्यक्तीवर कारवाई व्हावी, अनधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे, सिंह या व्यक्तीस सोसायटीच्या परवानगीशिवाय जागेचे व्यवसायिक जागेत रूपांतर करण्याची परवानगी म्हणजे 'चेंज ऑफ युज'ची परवानगी देण्यात येऊ नये याबाबत रहिवासी संस्थेने ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे तक्रार दाखल केली असून कारवाईची प्रतीक्षा आहे.