रस्ते सुरक्षा सप्ताहाची वाहन चालकांना नाही ...तर वाहतूक पोलिसानाच जास्त गरज

अर्धवट ज्ञानाचे पोलीस काय रस्ते सुरक्षा करणार? 


- मुख्यमंत्री ठाणे : राज्यात सर्वत्र सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह जोरदारपणे राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयानेही रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर नक्कीच स्वतःचे जीव वाचवतील असे भावनिक उद्गार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात काढले. मात्र वाहतूक व्यवस्थेची ठाण्यातील एकूण स्थिती पाहता वाहन चालकांना नव्हे तर टोव्हिंग वाहनांवरील व सिग्नल यंत्रणेजवळ कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनाच रस्ते सुरक्षा प्रशिक्षणाची जास्त गरज आहे. ठाण्यातील वाहतूक पोलीस दुचाकी टोव्हिंग करणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्या ऐवजी गाडीत मोबाईलवरच जास्त व्यस्त असल्याचे नेहमी दिसते. मुलं कोणती उचलतायत किंवा काय करतायत याकडे त्यांचे लक्षच नसते. टोव्हिंगवरील मुले दिसेत ती दुचाकी उचलून गाडीत चढविण्याचा सपाटाच लावतात. गाडी उचलतानाची त्यांची हालचाल अशी असते वाहने उचलून नव्हे तर चोरूनच नेत आहेत की काय. कोणतेही वाहन उचलण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून वाहन उचलत असल्याची घोषणा करणे आवश्यक आहे. मात्र, ठाण्यातील वाहतूक पोलीस ध्वनीक्षेपकाचा वापर करीतच नाही. सरळ दिसली गाडी की उचल... एवढाच सपाटा लावलेला असतो. गाडी उचलून टोव्हिंग वाहनावर चढवून पळण्याची त्यांना प्रचंड घाई असते. गाडी उचलत असल्याचे पाहिल्यावर गाडी मालक जवळ आल्यास गाडी त्याच ठिकाणी पार्किंग शुल्क आकारून सोडणे नियमानुसार आवश्यक आहे. मात्र ठाण्यात नियम धाब्यावर बसवन सर्रास गाडी मालकांना गाडी न देता चौकीवर बोलावण्यात येते. त्यामुळे वाहन चालकांना हातातील काम सोडून देत गाडीच्या मागे धावत जावे लागते. यामुळे गाडी मालकाला नाहक मनस्ताप होतो. टोव्हिंग वाहनावर कर्तव्याला असणारे पोलीस याकडे लक्ष देत नाहीत. टोव्हिंगवरील मुले गाडी मालकांना हाताने इशारे करत चौकीत या असे सांगतात. मग कर्तव्यावर असणारे पोलीस काय काम करतात? एका टोव्हिंग वाहनावर जास्तीत जास्त पाच दुचाकी घेण्याचा नियम असताना सहा वाहने घेण्यात येतात तर काही ठिकाणी सात वाहने घेण्याचा पराक्रमही करण्यात येतो. सिग्नल यंत्रणेजवळ कर्तव्यावर असणारे पोलिस चौकीत बसलेले असतात आणि ठाणे महापालिकेने जे वाहतूक वॉर्डन वाहतूक नियोजनासाठी पुरविले आहेत ते काम करत असतात. बऱ्याच ठिकाणी तर हे वॉर्डन गाड्या अडवून कागदपत्रे तपासतात. वाहतूक पोलीस वाहने टोव्हिंग करताना जास्तीत जास्त दुचाकीच उचलत असतात. मग ती दुचाकी गल्लीत असली तरी सुद्धा टोव्हिंगवरील मुले गल्लीबोळात जाऊन वाहने उचलण्याचे काम इनामे इतबारे करतात. मात्र कर्तव्यावरील वाहतूक पोलिस ध्वनीप्रेक्षकावरून वाहन उचलत असल्याचे सांगत नाहीत म्हणजे टोव्हिंगवरील मुले कायदा पाळतात(?) मग कर्तव्यावरील वाहतूक पोलिस काय करतात? विशेष म्हणजे चार चाकी, टेम्पो, मिनी बस, मोठी लॉरी, ट्रक किंवा मोठ्या बसेस टोव्हिंग करून नेताना कधीच दिसत नाहीत टार्गेट फक्त दुचाकी! याबाबत ठाणेकरांमध्ये जास्त रोष आहे. त्यामुळे जर वाहतूक पोलिसांनाच त्यांच्या कर्तव्याची जाणीव नसेल तर ठाणेकरांकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.


अटी/शर्ती


 1.सर्व कर्षित वाहने तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. सदर बाबींचे अनुषंगाने कर्षित वाहनांना दर महिन्याला तपासणीसाठी बोलाविले जाईल, त्यावेळी कर्षित वाहने न चुकता तपासणीसाठी वाहतूक मुख्यालयात हजर राहतील. तांत्रिकदृष्ट्या कर्षित वाहन सक्षम नसल्याचे आढळून आल्यास सदर कर्षित वाहनाची सेवा कमीत कमी सात दिवसांसाठी निलंबित करण्यात येईल.


२ सर्व कर्षित वाहनांवर दोन सीसीटीव्ही लावले जातील व ते अविरत सुरु राहतील.


३ कर्षित वाहनावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांचे आदेशाशिवाय कोणतेही वाहन कर्षित करू नये अथवा कर्षित | केलेले वाहन परस्पर पैसे घेऊन सोडू नये.


४ वाहन कर्षित करताना वाहन चालक उपस्थित झाल्यास ते वाहन कर्षित करून न आणता वाहनचालकांकडून तेथेच दंडनीय शुल्क घेऊन त्याचे ताब्यात दयावे. अशा वेळी क्रेनची शुल्क वाहनचालकांकडून घेण्यात येऊ नये.


५ कर्षित वाहनावरील कर्मचाऱ्यांची नागरिकांबरोबरची वर्तवणूक सौहार्दपूर्ण राहील याची काळजी कर्षित मालक घेतील. एखाद्या कर्षित वाहनावरील कर्मचाऱ्यास जर गैरवर्तणूकीच्या कारणामुळे काढले असेल अशा कर्मचाऱ्यांस दुसऱ्या वाहनावर सेवेकरिता घेण्यास सक्त मनाई राहील शिवाय अशा वाहनांची सेवा खंडित करण्यात येईल.


६ दुचाकी वाहन कर्षित करणे करता फळीचा (रॅमचा) वापर करणे आवश्यक राहील. ७ एका कर्षित वाहनावर जास्तीत जास्त पाच दचाकी घेण्यात याव्यात.


पायमल्ली


सदर नियमाची अंमलबजावणी करत असल्याचे आढळून येत नाही. अनेक वाहनांचे इन्शुरन्स संपलेले असतात. अनेक गाड्या धूर सोडत प्रदूषण करतात, याकडे दर्लक्ष केले जाते. कोणत्याही कर्षित वाहनांवर सीसीटीव्ही चालू नसतात. ज्यावेळेस मुले वाहन उचलत असतात त्यावेळेस कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांचे लक्ष सुद्धा नसते. याची अंमलबजावणी कधीच करण्यात येत नाही. कर्षित वाहनावरील कर्मचाऱ्यांची नागरिकांबरोबरची वर्तवणूक सौहार्दपूर्ण राहील, असा अनुभव ठाणेकरांसाठी दुर्लभ आहे. फळीचा वापर ठाण्यात कोठेही करण्यात येत नाही. पुरावा म्हणून वाहनावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. (जे बंद असतात.) सध्या सहा किंवा सात दुचाकी घेण्यात येतात.