विनापरवानगी कतल केलेल्या झाडांच्या आकडेवारीबाबत वृक्षप्राधिकरणचे अधिकारीच साशक

ठाणे : मंजुरी दिल्यापेक्षा अधिकच्या झाडांची खुलेआम कत्तल करण्यात आलेल्या ठिकाणाची ठाणे महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तब्बल तीन वेळा स्थळ पाहणी करून वेगवेगळी आकडेवारी दर्शविणारे तीन अहवाल सादर केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वेगवेगळे अहवाल देऊन वृक्षप्राधिकरण समितीस गोंधळात टाकायचे आणि वेळ मारून न्यायची असाच अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. नक्की किती झाडे विनापरवानगी तोडली याबाबत वृक्षप्राधिकरणचे अधिकारीच साशंक असतील तर दोषींवर 'घंटा' कारवाई होणार का? असा संताप सर्वसामान्य ठाणेकरांतून व्यक्त होत आहे. विनापरवानगी झाडांची कत्तल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास अभय देण्यासाठीच आणि आपली कातडी वाचविण्यासाठीच वृक्षप्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचा हा खटाटोप असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे झाडांची कत्तल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याआधी वेगवेगळ्या आकडेवारीचे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच सेवेतून उखडून टाकण्याची मागणी ठाणेकरांतून होत आहे.


बांधकाम व्यावसायिकास अभय देण्यासाठीच अधिकाऱ्यांचा खटाटोप


माजिवडे, ठाणे (प.) येथील विकास प्रस्ताव क्रमांक २००७/१०१ अंतर्गत इमारतीच्या बांधकामासाठी फक्त अकरा वृक्षांचे पुनर्रोपण, एक झाड तोडण्यास आणि एका झाडाच्या फांद्या छाटण्यास परवानगी असताना इमारत मालक अभिषेक परमार आणि वास्तुविशारद सुवर्णा घोष यांनी अधिकच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल केली. परवानगी नसताना बेकायदेशीरपणे अनेक वृक्ष तोडल्याप्रकरणी नगरसेवक संतोष वाढवले यांनी ५ नोव्हेंबर २०१९ रोजी भ्रमणध्वनीद्वारे वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीला अनुसरून वृक्ष अधिकारी व उद्यान तपासणीस अबोली गावडे यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करून फक्त चार झाडे तोडल्याप्रकरणी परमार व वास्तुविशारद सुवर्णा घोष यांना ८ नोव्हेंबर २०१९ रोजी दोन दिवसात खुलासा करण्याबाबत नोटीस(जावक क्र.१७०६) बजावली होती. सदर नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने उद्यान तपासणीस दिनेश होले यांनी पुन्हा पाहणी करून १५ नोव्हेंबर २०१९ रोजी वृक्ष अधिकारी यांना अहवाल सादर केला. अबोली गावडे यांनी दिलेला अहवाल आणि दिनेश होले यांनी दिलेल्या अहवालात तब्बल २८ झाडे अधिकची तोडल्याचा फरक होता. त्याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी परमार यांना ३२ झाडे तोडल्याप्रकरणी व दोन जादा झाडाचे पुनर्रोपण केल्याबाबत नोटीस(जावक क्र. १७४७) अदा करण्यात आली.


सदर नोटीसलाही परमार आणि घोष यांनी प्रतिसाद दिल्याने पुन्हा स्थळ पाहणी करून उद्यान तपासणीस दिनेश होले यांनी १४ झाडे विनापरवानगी तोडणे व दोन जादा झाडांचे पुनर्रोपण केल्याबाबत दिलेला तोंडी अहवाल २६ नोव्हेंबर रोजी वृक्ष प्राधिकरणाच्या झालेल्या सभेमध्ये वृक्ष अधिकाऱ्यांनी सादर केला. दिनेश होले यांनी स्वतःच १५ आणि २६ नोव्हेंबर रोजी दोन वेळा स्थळ पाहणी करून सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून स्वतः होले हेच साशंक असल्याचे दिसते. वृक्ष विशारद कृष्णनाथ धावडे आणि उद्यान तपासणीस दिनेश होले यांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा स्थळ पाहणी केली असता जिओ-टॅगिंग प्रमाणे एकूण ८५ वृक्षापैकी १४ वृक्षांची विनापरवानगी कत्तल व केवळ दोन जादा झाडांचे पुनर्रोपण करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पुनर्रोपण करण्यात आलेली झाडेही मृतावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वृक्ष अधिकारी, उद्यान तपासणीस दिनेश होले यांनी सादर केलेले तीनही अहवाल संशयास्पद असून विकासकाला अभय देण्यासाठी सादर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून विकासकावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्या अंकिता जामदार यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.


अशा अधिकाऱ्यांनाच सेवेतून उखडून टाकण्याची मागणी