गुन्हा काही दाखल झालाच नाही!
आयुक्त जयस्वाल यांना पोलीस स्टेशन सापडेना
उपायुक्त अशोक बुरपुलंना सल्ला घेण्यासाठी वकील मिळेना
महासभेत चर्चेचा विषय होता का?
मुख्यमंत्री टीम
ठाणे : ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला डावलून केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २४ तासांत मागे घेण्याची नामुष्की ओढवल्याने संतप्त झालेल्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अधिकाऱ्यांची आई- बहीण काढल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊन मागील आठवड्यात प्रचंड रान तापले. ठाण्याच्या विकासाची ध्येयधोरणं ठरविल्या जाणाऱ्या महासभेतही प्रशासकीय कामकाजाबाहेरच्या या विषयावर 'मनमुराद' चर्चा घडवून आणण्यात आली. हा प्रकार महिलांसाठी अवमानकारक असल्याने महिला नगरसेविका आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली. विद्यमान सचिव अशोक बुरपुल्ले यांनी 'मी माझ्या आईचा अपमान समजतो' असे भावनिक विधान करीत कायदेशीर सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी आयुक्तांनीही अनधिकृत बांधकाम माफियांशी हितसंबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे विधान केले होते. मात्र दोन्हीही बाजूंनी अद्याप गुन्हा काही दाखल झालेला नाही. एवढेच काय पण त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारच्या हालचालिही नाहीत. एकूणच काय तर आरोप प्रत्यारोप करत नुसतीच कुथाकुथी झाली, 'आऊट'पुट' काहीच नाही.
महासभेत चर्चेचा विषय होता का?
अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवरील घडलेला प्रकार हा अधिकाऱ्यांची अंतर्गत बाब होती. प्रशासकीय कामकाजाबाहेरच्या विषयावर महासभेत चर्चा व्हायला नको होती. चर्चा करायचीच होती तर त्याच व्हाट्सअप ग्रुपवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांची करायची होती. 'ठाणे महापालिकेशी निष्ठा न ठेवणारे अधिकारी आणि महापालिका विकायला निघालेले अधिकारी,' हा आरोप गंभीर आहे. खुद्द आयुक्तच हा आरोप करत असतील तर ती बाब अत्यंत गंभीर. त्याबाबत महासभेने सचिवांना विचारणा करायला हवी होती. आयुक्तांनी केलेल्या पोस्टपैकी आपल्या सोयीच्या पोस्ट तेवढ्या व्हायरल करण्याबाबत सदस्यांनी प्रशासनाला जब विचारायला हवा होता.
उपायुक्त अशोक बुरपुलंना सल्ला घेण्यासाठी वकील मिळेना
ठाणे महापालिका आयुक्तांच्या व्हाट्सअप ग्रुपवरील अधिकाऱ्यांची आई- बहीण काढल्याचा स्क्रीनशॉटचे महासभेतही पडसाद उमटवले गेले होते. आयुक्तांची शिवराळ भाषा हा अंतर्गत विषय असला तरी अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादाचा लाभ उठविणार नाहीत ते राजकारणी कसले? तसं नसतं झालं तर राजकीय धर्माचा अवमान ठरला असता. म्हणून आपल्या राजकीय धर्माला जागत प्रशासकीय कामकाजाबाहेरच्या सदर विषयावर महासभेत चर्चा घडवून आणण्यात आली. ज्या ग्रुपवर हा प्रकार घडला त्या ग्रुपवर महिला अधिकारीही असल्याने ही असा प्रकार घडायला नको होता, अशी भूमिका नगरसेविकांनी मांडली. सदर प्रकाराचा निषेध करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सबंधीतांवर कारवाईची मागणी केली. विद्यमान महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, विरोधी पक्षनेत्या प्रेमिला केणी, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी विशेष भूमिका निभावली. सभागृहाचे संरक्षण घेत ठामपाचे सदर प्रकार घडल्याच्या प्रकाराला सचिव अशोक बुरपुल्ले यांनी दुजोरा देत हा प्रकार मी माझ्या आईचा अपमान समजतो, असे भावनिक विधान केले. शिवाय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सदर प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन संबंधीतावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आणि त्यासाठी ८० वर्षांच्या आईला गावावरून बोलावून घेतल्याचे सांगितले. सदर प्रकार घडण्यापूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सचिव विभागात अनियमितता असल्याचा आरोप केला होता. शिवाय अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम माफियांशी सबंध असून ठाणे महापालिका विकायला निघालेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांमधील वादाचा विषय माध्यमांनीही यथोचित चगळला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या बातम्यांचा माध्यमातून सपाटाच सुरु झाला होता. ‘गुन्हा दाखल करणार असल्याचा ठाणे महापालिका सचिवांचा निर्धार' अशा मथळ्याखाली बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. एकूण वातावरण पाहता ठाणे महापालिकेत आता काहीतरी मोठं घडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र घडल्या प्रकाराला दहा दिवस उलटून गेले तरी आजपर्यंत बुरपुल्ले यांना वकिलांचा सल्ला मिळाला नाही, अन् आयुक्तानांही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे मिळालेले नाही. घडल्या प्रकारातून ठाणेकरांनी साधले काय? हा प्रश्न निर्माण होतो. आयुक्तांची शिवराळ भाषा म्हणजे मी माझ्या आईचा अपमान समजतो. सदर प्रकारात कायदेशीर सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगून त्यासाठी ८० वर्षांच्या आईला गावावरून बोलावून घेतल्याचे भावनिक विधान करणाऱ्या बुरपुल्ले यांनी आता आईला गावी परत पाठविले का? असा सवाल ठाणेकर करीत आहेत.