म हाराष्ट्रातील राजकारणी घराण्याची दुसरी, तिसरी पीढी राजकारणात येत आहे. राज ठाकरेंचा मुलगा असो किंवा अजित दादांचा मुलगा पार्थ असो, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे असो किंवा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा डॉ. सुजय विखे असो, की सुनिल तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे असो किंवा मुलगी आदिती तटकरे असो... असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. यामध्ये जरा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल. की गेल्या कित्येक वर्षात एक बच्चू कडू, राजू शेट्टी सोडता महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटूंबातून एकही नेतृत्व पुढे आलेलं नाही.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो तेव्हा कोणी आक्षेप घेत नाही मात्र राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला की घराणेशाहीचा शिक्का मारला जातो हे योग्य नाही असा पवित्रा राजकारणी नेहमीच घेत असतात... राजकारण्यांचं हे लॉजिक मान्य नाही... कारण राजकारण्यांच्या मुलांचे राज्याभिषेक होतात.. डॉक्टर किंवा वकिलांचे तसे नाही.. त्यासाठी मुलाला एमबीबीएस किवा एलएलबी व्हावं लागतं.. तरच ते डॉक्टर किंवा वकील होऊ शकतात.. डॉक्टर, वकील त्यांच्या मुलांचे राज्याभिषेक करून ते जनतेवर लादू शकत नाहीत... राजकारण्यांच्या मुलांना राजकारणात येण्यासाठी कोणतीही डिग्री मिळवावी लागत नाही.. एकच पात्रता लागते बाप राजकारणी असला की मग बाकी काही लागत नाही.. का झाले असे? तिकडे गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी सारखा तरुण पंतप्रधानांच्या मतदार संघात निवडून येतो. पंचवीशी देखील पार न केलेला तरुण पाटीदार समाजाचा नेता बनतो (हार्दिक पटेल). बिहारचा राहणारा असणारा कन्हैय्या कुमार दिल्लीत शिक्षण घेऊन मोदींच्या धोरणांविरोधात दंड थोपाटतो आणि एक विद्यार्थी नेता म्हणून पुढे येतो. उमर खालीदसारखं नेतृत्व मुस्लीम समाजातून पुढं येत आहे. असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. मात्र महाराष्ट्राचे काय? किती नेते गेल्या दशकात सर्व सामान्य कुटूंबातून वर आले ?
मला असं वाटतं यात लोकशाहीची पर्यायानं जनतेची हार तर आहेच. मात्र जनतेला याची जाणीव कधी होणार? आपल्यावर राजकीय नेत्यांची मुलं किती दिवस लादली जाणार? सर्वसामान्य जनतेतून गेल्या कित्येक वर्षातून एकही नेतृत्व समोर आलेले नाही. या महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेतून एखादा विद्यार्थी नेता का उद्यास येत नाही. की त्याला राजकारणात येऊ दिलं जात नाही. की असं वातावरण तयार झाले आहे की, राजकारण फक्त प्रस्थापित आमदारा-खासदारांच्या मुलांसाठीच असतं...? । जरा विचार करा बिहारचा कन्हैया कुमार आज महाराष्ट्रभर आपल्या तरुणांसमोर भाषण करत तरुणांची मन जिंकत आहे. अशा वेळेला आपल्या तरुणांच्या मनात हे का येत नाही, आपणही राजकारणात यावे.
जातीच्या आरक्षणाच्या आंदोलनात मी पाहिले आहे की, कित्येक तरुण अशी आहेत... ज्यांची भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाली. या तरुणांची भाषण का व्हायरल झाली? कारण त्या तरुणांचे विचार समाजाला पटत होते. आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की, कार्यकर्त्याचा पोरगा आमदाराच्या पोराचा कार्यकर्ता झाला आहे. कधी तरी या पोरानं विचार करायला पाहिजे. नेता कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होतो. म्हणजे तुमचा बाप जर कार्यकर्ता असेल तर त्याच्या जीवावर नेता मोठा होतो. या नेत्याच्या मागं पुढं करत आपला बाप कार्यकर्ता झाला आणि कार्यकर्ता म्हणूनच मरणार आहे. मात्र, तुम्ही हा निश्चय करायला हवा, मी कार्यकर्ता म्हणून मरणार नाही तर नेता म्हणून मरणार. कारण मी गांडूची अवलाद नाही. नेत्याच्या पुढे हात हालवत फिरायला. ___- शिवाजी काळे