ठाणे महापालिका प्रशासन प्रत्येक वर्षी नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरता यावा या उद्देशाने महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये व उप प्रभाग कार्यालये सुट्टीच्या दिवशीदेखील सुरु ठेवते. नागरिकांच्या हितार्थ प्रशासनाकडून दाखविली जाणारी ही तत्परता खरंच गौरवार्थ आहे. पण नागरिकांकडून वसुली करण्यासाठी जशी तत्परता दाखविली जाते तशीच तत्परता नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्येही दाखविणे गरजेचे आहे.. ज्यांच्याकडून वसूल होणाऱ्या करातून आपली भूक' भागते त्या सर्वसामान्य ठाणेकरांबाबत ठाणे महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. 'अर्थपूर्ण' गोष्टी असणाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनचे दरवाजे अगदी रात्री सातनंतर पण उघडे असतात. मात्र, सर्वसामान्य करदात्या ठाणेकरांना मात्र महापालिकेत वेळेचं बंधन लादलं जातं. नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ दिला जावा असं आमचं अजिबात म्हणणं नाही. फक्त नियोजित वेळेतील अधिकाधिक वेळ सर्वसामान्य करदात्या ठाणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. ज्यामुळे नागरिकांना लहान-लहान कामांसाठी वाऱ्या कराव्या लागणार नाहीत. बहतांशी सर्वसामान्य नागरीक मग तो कुठलाही असो, तो प्रशासनाच्या कारभाराबाबत अनभिज्ञ असतो. प्रशासनाचा कारभार कसा चालतो, याची माहिती नाही, ही उच्च शिक्षितांची स्थिती आहे. मग अल्प शिक्षित आणि अक्षरज्ञान नसणाऱ्यांची कल्पना न केलेली बरी. कोणत्या कामासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज भासते, ती कुठून कशी मिळवायची याबाबत सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक प्रभाग कार्यालयात योग्य ते मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. फक्त माहिती दर्शविणारे फलक दर्शनी भागातलावले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे प्रशासनाने समजू नये. प्रत्येक करदात्या नागरिकाची समस्या समजून घेणे आणि ती करदात्याला समजत नाही तोपर्यंत समजून सांगणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासनाने मालकाच्या भूमिकेतून आधी बाहेर यायला हवे. दुकानदार किंवा प्रत्येक व्यावसायिक ग्राहकाला 'भगवान' मानतात, त्याच पद्धतीने प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने आपला करदाता हाच आपला 'जीवनदाता' आहे याचे भान असायला हवे.
'करदाता' हाच 'जीवनदाता'!
• मुख्यमंत्री