रागातील सकारात्मक ऊर्जा..

राग प्रत्येक सजीवाला असणारी नैसर्गिक देणगी. जीच्यामुळं प्रत्येक सजीवानं फायदा कमी आणि नुकसान अधिक करून घेतलेलं आहे. त्यात मनुष्यप्राणी आघाडीवर. या रागातून मनुष्य प्राण्यानं दसऱ्यांचे जीव तर घेतलेले आहेतच, शिवाय स्वतःचेही जीव दिले आहेत. खरंच राग इतका भयानक आहे. खरं तर निसर्गनियमाप्रमाणे राग यावा. पण माणसाने त्याचा उपयोग उत्कर्षासाठी करावा, पेटून उठून प्रगतीसाठी करावा. माणसाला राग यावा पण... कोणत्या गोष्टीचा? त्या गोष्टीचा राग यावा जिच्यासाठी पेटून उठल्यावर उत्कर्षाचा मार्ग सापडेल. रागाची ऊर्जा व्यर्थ जाता कामा नये. राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात.  मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलून टाकली. नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली. आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनीही तेच केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं! ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की! अर्थहीन गोष्टींवर रागराग करुन आपली बहमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणून 'लाईट गेली', याचा स्वीकार करा आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रमामाण व्हा!, त्याचा आनंद घ्या! असंच समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवून, आजुबाजुच्यांशी भांड्न काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा आणि आनंद घ्या! कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा. म्हणजेच स्वतःला दररोज सुधारून सिद्ध करायला हवं. कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणून अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते. आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात. अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा? म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं, तिथुन निघून जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं! ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळून जाईल. कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल! या गोष्टी आत्मसात नाही केल्यात तर हाच राग कदाचित लकवा आणू शकतो, त्याच बरोबर रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, निद्रानाश व डिप्रेशन देखील आणू शकतो... त्यामुळं रागाचा वापर कशासाठी करायचा? हा सर्वस्वी स्वतःचा निर्णय असतो. येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा तुमची शक्ति होणे आवश्यक आहे.