२०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला परस्पर पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि नंतरची पाच वर्षे शिवसेनेची फरफट झालीशिवसेनेच्या या अवस्थेला तसं पाहिलं तर शरद पवारच जबाबदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं तेव्हा भाजपला पाठिंबा जाहीर केला नसता तर शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा, तोही अधिक सन्मानपूर्वक मिळाला असता. परंतु राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात आणि तत्कालीन परिस्थितीने शरद पवारांना तसा निर्णय घ्यायला मजबूर केले होते. शरद पवार यांनी पाठिंब्याचा निर्णय घेऊन भाजपला उपकृत केले नसते तर गेल्या पाच वर्षांत पवारांचे अनेक सहकारी तुरुंगात जाण्याची भीती होती. परंतु आपल्या निर्णयामुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा सल त्यांच्या मनात असावा. दुसरी गोष्ट अशी की शरद पवार कुणाचा हिशेब शिल्लक ठेवत नाहीत, चांगला किंवा वाईट अशा दोन्ही अर्थांनी. सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठीच्या पहिल्या निवडणुकीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समजल्यानंतर त्यांनी ती निवडणूक बिनविरोध घडवून आणली होती.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आपले सारे कौशल्य पणाला लावून गेल्यावेळी घडलेल्या चुकीची भरपाईही केली आणि सुप्रिया सुळे यांना शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या मदतीची परतफेडही केली. पवारांनी १७ सप्टेंबरला सोलापूरपासून दौरा सुरू केला होता. त्यावेळी पक्षाची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. अनेक सहकारी सोडून गेले होते. पक्षाला उमेदवार मिळतील की नाही, असे वाटण्याजोगी परिस्थिती होती. पक्षाचे इतर नेते, समर्थक, हितचिंतक हबकले होते. परंतु पवारांनी हिंमत सोडली नव्हती. खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांच्या प्रमुख सहभागाने निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता. खासदार उदयनराजे भोसले त्यात सहभागी होण्याची घोषणा केली होती, ते सहभागी झाले असते तर आणखी माहोल झाला असता,
परंतु ऐनवेळी ते शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले नाहीतच, उलट खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी पक्षावर मोठा घाव घातला. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्या भाषणांना प्रतिसाद मिळत असताना आणि चांगली वातावरणनिर्मिती होत असताना त्या यात्रेतही रटाळ भाषणे करणारी पक्षाची बडी धेडे घुसली आणि शिवस्वराज्य यात्रेतला ताजेपणा, उत्स्फुर्तपणा घालवून टाकला. शरद पवारांना ते आवडले नव्हते, परंतु जे घडत होते ते रोखण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. कारण सगळीकडूनच वारे उलटे फिरल्याची स्थिती होती. या नेत्यांना . दुखावण्यामुळे त्यात भर पडण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी स्वतः सगळी प्रचाराची । सूत्रे हाती घेऊन सोलापूरपासून प्रारंभ केला. भारतीय जनता पक्षाने सगळ्यांना अंकित केले असताना, सगळी प्रस्थापित धेंडे भाजपमध्ये गेली असताना एकटे शरद पवार मैदानात उतरले असल्याचे चित्र रोमहर्षक होते. या ७९ वर्षांच्या लढवय्याला बळ देण्यासाठी त्यांच्याभोवती तरूणांची गर्दी होऊ लागली. दौरा जसजसा पुढे जाऊ लागला तसे राज्यातील वातावरणही बदलू लागले. मोदी-शहा-फडणवीस यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रसारमाध्यमांनाही बदलाची नोंद घेण्यावाचून पर्याय उरला नाहीअनेक सहकारी सोडून गेले तरी शदर पवार यांनी कुणाबद्दल वाईट शब्द काढला नाही. उलट त्यांना शुभेच्छाच दिल्या होत्या.
परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मात्र त्यांनी एकेकाची त्यांच्या गावात जाऊन आपल्या खास शैलीत अशी काही बिनपाण्याने केली की संबंधितांना ती आयुष्यभर लक्षात राहील. देवेंद्र फडणवीस सत्तेच्या उन्मादात, ऋसमोर पैलवान नाहीत्र वगैरे भाषा करीत होते. शोले सिनेमातले डायलॉग मारत होते. त्यांना पवारांनी हाताच्या एका इशाऱ्याने असे काही उत्तर दिले की, त्यांनी पुढं ऋपैलवानऋ हा शब्दसुद्धा उच्चारला नाहीप्रसारमाध्यमांनी पवार घसरले... वगैरे गु-हाळ लावले, परंतु पवारांच्या झंझावातात ते फार काळ चालले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या एका टप्प्यासाठी सोलापूरला आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ऋशरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? असा प्रश्न विचारण्याचे औद्धत्य दाखवले. त्यावर, ऋ मी महाराष्ट्रासाठी काय केले ही वेगळी गोष्ट आहे, परंतु कुठल्या चुकीच्या कामासाठी मी तुरुंगात गेलो नाही अशा शब्दात शरद पवार यांनी उत्तर दिले. तेच अमित शहा यांच्या जिव्हारी लागले. पुढं ईडीच्या नोटिसची जी भानगड उपटली त्याला पवारांनी दिलेलं हे उत्तर कारणीभूत होतं. आपण अजून म्हातारे झालेलो नाही... अजून लई जणांना घरी पाठवायचं आहे..., जे पक्ष सोडून गेले ते कितीही मोठे असले तरी सारे इतिहासजमा होतील... वगैरे षटकार मारून पवार तरुणांची मनं जिंकत होते. अनेक मोठी माणसं सोडून गेल्याचं वरवरचं चित्र असलं तरी असंख्य सामान्य कार्यकर्ते सोबत असल्याचा विश्वास मिळत गेला. उदयनराजे सोडून गेल्यानंतर पवार उदयनराजे सोडून गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच साताऱ्यात आले तेव्हा स्वागताला जमलेला जनसमुदाय थक्क करणारा होता. ऋ कोण आला रं कोण आला? मोदी-शहाचा बाप आला... ऋ अशा घोषणांनी आसमंत दमदमून गेला.
या घोषणेमध्ये त्यावेळी अतिशयोक्ती वाटत होती, परंतु मोदी-शहांचा अंतिम डाव उधळून लावल्यानंतर साताऱ्यात दिलेली ती घोषणा किती सार्थ होती, याची कल्पना आली. शरद पवार मधे दिल्लीत गेल्यानंतरचा त्यांचा दिनक्रम बघितला तरी थक्क व्हायला होतं. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारापर्यंत अखंडपणे कार्यरत असलेले पाहायला मिळाले. अजित पवार यांचा शपथविधी झाला त्यादिवशीही सकाळी साडेसातच्या सुमारास कार्यरत झालेले पवार रात्री बारापर्यंत अखंड व्यस्त होते. शरद पवार दिल्लीत गेले तरी काटेवाडीच्या सोसायटीवरसुद्धा त्यांचे लक्ष असते असे म्हटले जायचे. ऋघार फिरे आकाशी...ऋ वगैरे शब्दात त्याचे उदात्तीकरणही केले जायचे. परंतु वस्तुस्थिती वेगळी होती. त्यांचे महाराष्ट्रातील बारीकसारीक गोष्टींवर लक्ष असले तरी महाराष्ट्र सरकारच्या कारभारात मात्र त्यांनी लक्ष घातले नाही. सगळे सहकारी सुजाण असल्यामुळे ते नीट काम करतील असा विश्वास त्यांना होता. १९९९ ते २००४ या काळात सगळ्यांनी उत्तम काम करून तो सार्थ करून दाखवला. त्याचे फळ २००४ मध्ये मिळाले आणि ७१ जागा जिंकणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या एका टर्मनंतर मात्र अनेक गोष्टी बिघडत गेल्या. केंद्रातीय यूपीए -१ आणि युपीए-२ च्या काळात झालेतशाच गडबडी महाराष्ट्रातही झाल्या. तिसऱ्या टर्ममध्ये तर भ्रष्टाचाराबरोबरच सत्तेचा माज टिपेला पोहोचला आणि सरकार बुडाले. पूर्वीचा अनुभव पाहता शरद पवार मागची चूक आता करणार नाहीत.
ते सरकारच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत, पण नीट लक्ष ठेवतील. कारण सरकार आणण्यासाठी निवडणूक प्रचारात खस्ता त्यांनीच खाल्ल्या आहेत. काँग्रेस-शिवसेनेला एकत्र आणून आघाडी सरकारची निर्मिती त्यांनीच केली आहे. त्यामुळे काही वावगे घडले तर महाराष्ट्रातील जनता त्यांनाच जबाबदार धरणार आहे आणि जाबही विचारणार आहे. या सगळ्याच्या पलीकडं जाऊनही काही विचार करण्याची गरज आहे. शरद पवार थकता चालताहेत. बसताहेत. उठताहेतचालताहेत. धावताहेत. ७९ वर्षांच्या माणसानं कितीदा उठावं बसावं, किती चालावं, एका जागी उभं राहून किती बोलावं, दिवसातून किती सभा घ्याव्यात, किती मीटिंगा घ्यावात, कार्यकर्त्यांशी बोलावं, बैठका घ्याव्यात, नियोजन करावंसगळंच आश्चर्यचकित करणारं आहे. ही ऊर्जा येते कोठून असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला पडलाय. चालता चालता पवारांच्या पायाला जखम झाली त्यामुळं स्टेजच्या पायऱ्या चढता-उतरताना त्यांना कुणाचातरी आधार घ्यावा लागायचा. प्रचाराच्या काळात झालेल्या जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत. आता तर दोन्ही पायांच्या बोटांना जखमा झाल्या आहेत त्यामुळे दोन्ही पायांना बँडेज गुंडाळलेले दिसते. पवारांच्या शरीरावरच्या या जखमा फोटोमधून दिसताहेत तरी. परंतु अविश्रांत राबणाऱ्या या ७९ वर्षे वयाच्या म्हाताऱ्याच्या मनावर जे घाव झालेत, त्यामुळं ज्या जखमा झाल्या आहेत, त्याचा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही. माणूस केंद्रस्थानी ठेवून राजकारणसमाजकारण करणाऱ्या पवारांच्यातल्या माणसाकडं, त्यांच्या दृश्य-अदृश्य वेदनांकडं पाहायला मात्र कुणाला सवड नाही. घरातल्या माणसांची दुखणी खुपणी बघणाऱ्या, सगळ्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या कर्त्या माणसाच्या मनाची अवस्था होते तशीच पवारांची होत असेल का? शरद पवार हे केवळ राजकीय चाली खेळणारे यंत्रमानव आहेत अशा रितीनं सगळे त्यांच्याकडं पाहतात. शरद पवार हासुद्धा एक हाडामांसाचा माणूस आहे, हे आपण विसरून गेलोय का? - विजय चोरमारे