दिव्यात बांधकामं तोडली गेली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही ।५कारवाई झाली. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान झालाच पाहिजे. पण प्रश्न या ठिकाणी हा उपस्थित होतो की या विभागमध्ये बांधकाम सरू असताना येथील अधिकारी काय करत होते? येथील लोकप्रतिनिधी काय करत होते? उपमहापौर तर दिव्याचे होते. विरोधी पक्षात राहून जे अनधिकृत बांधकामाला विरोध करत होते ते आज स्वतः अनधिकृत बांधकामामध्ये अडकले आहेत आणि नागरिकांची फसवणूक करत आहेत. ठाणे महापालिकेत ज्यांची सत्ता आहे ते काय करत होते? ही लोक बेघर झाली नाहीत तर या लोकांना ठाणे महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या, विरोधात राहून विरोधाचे नाटक करणारे नेते आणि दिवा प्रभाग समितीमध्ये अधिकारी असणाऱ्या लोकांनी बेघर केलं आहे.
डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला चाळीचं बांधकाम करायला परवानगी दिली कुणी? इतक्या मोठ्या प्रमाणात चाळी उभ्या राहत असताना त्यांना दिसले नाही का? जर दिसलं असेल तर त्यावर त्याचवेळी कारवाई का केली गेली नाही? हा प्रश्न मात्र याठिकाणी उभा राहतो. हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले, मुलं बाळं बेघर झाली याचं असते कुणाला खाजगी जमिनीवर गरजेपोटी होणारी बांधकामं हा विषय समजण्यासारखा आहे. भूमिपुत्रांवर नेहमीच शासन यंत्रणा अन्याय केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूमिपुत्र त्यांच्या खाजगी जमिनीत गरजेपोटी बांधकाम करतात. परंतु खाडीकिनारी उभ्या राहणाऱ्या चाळी आणि डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या चाळी याचं समर्थ होणार नाही, करता येणार नाही. आज ज्या गरिबांची घरे तुटली त्यांची फसवणूक झाली. ही फसवणूक जशी लबाड बिल्डरांनी केली, तशी ती पालिका सत्ताधारी आणि दिवा प्रभाग समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी केली. या अधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं काही नुकसान झालं नाही. नुकसान झालं ते गरिबांचं सामान्य नागरिकांचं. दिवा डम्पिंगच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या चाळी हे पाप कुणाचं? ज्यांना शहराची देखरेख करायला पाठवलं तेच शहर ओरबडून खाणार असतील तर याला काय म्हणावं. पालिका सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःतील माणसाला विचारावं तिथे बेघर झालेली माणसं कुणामुळे बेघर झाली? त्यांना आतून आवाज ऐकू येईल या सर्व प्रकाराला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत.
पण हे लोक इतके निर्दावलेले आहेत त्यांना गरिबांच्या घरांशी काही देणेघेणे नाही. फक्त गर्दी जमली की तिथे जाऊन कसं भाषणबाजी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची हा प्रकार हल्ली दिव्यातील चमकू नेत्यांमध्ये दिसतो. हे दिव्याचे दुर्दैव आहे. दिव्यात आज एकही मास लीडर नाही. नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक होईल असं एकही नेतृत्व नाही. आज डम्पिंग जवळच्या चाळी तुटल्या आहेत उद्या अन्य ठिकाणच्या घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. कारण जो दिवा वसला आहे तो मोठ्या प्रमाणात अनधिकृततच आहे हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांनी आपल्या घरांबाबत आता जागृत असायला हवं. कुठलाही नेता दिवावासीयांच्या मदतीला धावून येणार नाही. दिव्यातील नेते हे फक्त राजकारणच करतात, लोकांना मदत करण्याची त्यांची मानसिकता अलीकडच्या प्रकरणात तरी दिसली नाही. कारण जर यांना लोकांची काळजी असती तर यांनी डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला चाळी उभ्या राहू दिल्या नसत्या.