नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर स्थानकात थांब्याची मागणी

ठाणे : कोकणातील संगमेश्वर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेच्या नेत्रावती व मत्स्यगंधा (अप आणि डाऊन) या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी मंगळवारी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कोकणातील प्रवाशांची गैरसोय टाळावी यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे ग्रुपचे संस्थापक संदेश जिमन यांनी सांगितले ___ संगमेश्वर हे कोकणातील अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात गणेशोत्सव दिवाळी आणि मे महिन्याच्या कालावधीत तर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे असे असतानाही या स्थानकात मस्यगंधा आणि नेत्रावती एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी समाज माध्यमावर अत्यंत प्रसिद्ध आणि चर्चेत असलेल्या निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्यावतीने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शैलेश अंबार्डेकर यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर या गाड्यांना थांबा मिळावा असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रुपचे संस्थापक संदेश जिमन यांनी आंबर्डेकर यांच्याशी एकंदरीत परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिमन यांच्यासोबत नरेंद्र खानविलकर, मंगेश सुर्वे, अजित सुर्वे आदी उपस्थित होते. संबंधित विषयासाठी पत्रकार सुधीर मुणगेकर, विनोद पितळे, संतोष कांबळे आदींनी विशेष सहकार्य केले.