न्यायासाठी लढणाऱ्याला शिक्षा..अन् लंपटाला संरक्षणाची भिक्षा!

जच्या लोकशाहीत _पैसे की तुती बोलती है अशीच परिस्थिती दिसत आहे. आज जर आगरकर, लोकमान्य टिळक आणि आचार्य अत्रे असते तर अशा लंपट शिक्षकाला शाब्दिक जोडे मारीत त्याची वरात काढली असती, पत्रकारिता आणि शब्दाचे प्रहार ते असतात ज्यात शब्दाच्या एका वाराने लंपटाची कपडे फाटतात. दिसायला ती शाबूत असतात मात्र ज्याच्यावर वार झाला त्याला स्वतःला नागडे झाल्यासारखे वाटते. अशा पत्रकारितेवर अंकुश लावण्याचा प्रयत्न आज खऱ्या अर्थाने करण्यात येत आहे. ठाण्यात पैसे की तुती, अन लंपटांची धोती उचलून धरणारे वाढल्याने सच्चाई आता टोचू लागली आहे. म्हणून पैशाच्या माजावर आणि दुसऱ्याच्या संसाराच्या होळ्या करून लोकांना संपविण्याचा प्रताप सुरु आहे. अशा लोकांनाचा संपविण्याचा घाट घालणे हे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य ठरेल.


___ शिक्षक एक गुरुवर्य, माणसाच्या आणि लहान मुलांच्या जीवनाला एक आदर्श घडविणारे शिल्पकार म्हणून शिक्षकांचा गौरव होत असतो. आजही असे शिक्षक आहेत. मात्र माजुऱ्या आणि लंपट शिक्षकांच्या घोळक्यात आदर्श शिक्षक दिसेनासे झाले आहेत. शिक्षक आई, बाप, पालक आणि ज्ञानाचे भांडार असतात. शिक्षकांच्या आदर्शावर या देशाची पिढी घडते आहे. मात्र जग बदलत चालले आहे तसे शिक्षक बदलले आणि विद्यार्थीही बदलले आहेत. तरीही शिक्षकाचे महत्व आजही कमी झालेले नाही. पण असे आदर्श ठरणारे शिक्षक हे बोटावर मोजण्या इतकेत आहेत. नाहीतर स्त्रीलंपट शिक्षकांची भरमार आज पाहायला मिळते. मात्र जुन्या शिक्षकांचे आदर्श आणि मान पाहता आजच्या शिक्षकाला लायकी नसताना मान द्यावा लागतो आहे. दसऱ्याची बायको पळवून आणायची, तिला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावायचा आणि आपण मजा मारायची, पतीने न्यायासाठी एल्गार केला तर त्याचा पुरुषार्थ दाबण्यासाठी त्याला त्याच्याच पूर्वाश्रमीच्या पत्नीद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करायचा. यापेक्षाही भयानक ज्या पत्नीने अग्नीस साक्षी ठेवून सात फेरे घेतले, ज्याने समाजात तिला मान सन्मान दिला, त्याच पतीसोबत घटस्फोट होताच त्याचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्लज्ज महिला याही स्त्री जातीला कलंक ठरत आहेत. आयुष्याचा सन्मान हरविलेल्या पतीने व्यथा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांकडे मांडली.


अन पत्रकाराने निर्भीडपणे लंपट शिक्षकाचे कपडे पत्रकारितेच्या आचारसंहितेच्या चौकटीत फाडले. तर त्या पत्रकारालाही अडकविण्याचा प्रयत्न करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम एका स्त्रीच्या पदरामागे लपलेल्या शिक्षकाने करावे हा त्या स्त्रीचाही आणि पुरुषाच्या पुरुषार्थाचाही अनादर आहे. मात्र तरीही सत्यता समजल्यानंतरही जर कायद्याची दाबून मुटकून अंमलबजावणी होत असेल तर अशा लंपट शिक्षकाला सत्य मांडणे हा जर गुन्हा, तर तो करू पुन्हा... पुन्हा हे दाखवून देणे गरजेचे आहे. दुसऱ्याचे झोपडे उद्धस्त करायचे आणि स्वतःचा रंगमहल सजवायचा असे शिक्षण आणि संस्कृती जर त्या बालमनावर लादली गेली तर निश्चितच येणारी पिढी ही लंपट होईल असेच चित्र दिसत आहे. एक प्रामाणिक आणि स्वकष्टावर कमविलेल्या पैशांवर उदरनिर्वाह करणारा आणि भ्रष्टाचाराची कीड न लागलेला माणूस म्हणजेच शिक्षक. पण आज ठाण्यातील एका घटनेवरून मात्र शिक्षकाची परिव्याख्याच बदलली आहे. शिक्षक लंपटगिरी, भोगी, चुना लावणारा असल्याचे समोर आले आहे. विद्येच्या मंदिरात अवगुणांचा महामेरू असल्याचे दिसत आहे.


एका पिडीत पती, उद्धस्त झालेला पती याने जर लोकशाही देशात आपल्या व्यथा जगासमोर मांडल्या तर त्यात चूक काय ? बदनामी कुणाची? अन त्यांनी केलेलं कर्म हे तर अवघ्या स्त्री जातीला कलंकित करीत आहे. त्याचे काय? संस्कृतीची वरात काढीत आहे त्याचे काय? यांच्या दुष्कर्माबद्दल त्यांना शिक्षा करणार कोण? आज एका पत्रकाराला एक बातमी, एक सत्यता प्रसिद्ध केली म्हणून जर इतका त्रास सहन करावा लागत असेल, तर येणाऱ्या काळात पत्रकार बदलले असे म्हणण्यास जागाच राहणार नाही. बदनामी तेव्हाच होते. त्या धर्तीचे कर्म केले तर. पण सत्य मांडले म्हणून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात जर न्याय मागणीसाठी उपोषणाला बसावे लागत असेल तर लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कागदावरच आहे असे म्हणावे लागेल. एखाद्याला न्याय देण्यासाठी जर पत्रकार पुढे आला तर त्या पत्रकाराला न्याय मागणीसाठी उपोषणाला बसावे लागते हेच या लोकशाहीचे दुर्दैव आहे. न्याय की अन्याय याचा निर्वाळा करण्यासाठी असलेल्या यंत्रणांनी अशा प्रकरणाची सखोल चौकशी करूनच कायदेशीर कारवाई करणे कधीही लोकशाहीत रास्त ठरेल. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निर्दोष फासावर लटकता कामा नये असे कायदा म्हणतो पण ठाण्यात प्रत्यक्षात काय दिसतंय, काय अनुभवास येतंय? तर शंभर बरबटलेले सुटले तरी चालतील, पण एक न्याय देण्याची भूमिका बजावणारा स्वच्छ पत्रकार सुटता कामा नये. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय. तेव्हा अशापिलावळींना वेळीच आवर घाला नाहीतर उद्या मारण्यासाठी म्हातारीच राहणार नाही, अन न्याय देण्यासाठी पत्रकारही पुढे येणार नाही. अशी वेळ येऊ देऊ नका... आणि लंपटाच्या माथी हाणू काठी, घ्या फैलावर उचला त्याची ताटी, एवढे असू द्या जनमानसात शौर्य, अपप्रवृतीना नका देऊ धैर्य.... ज्याचे जळते त्यालाच चटक्याची दाहकता कळते, पण तुम्ही आम्ही सुज्ञ आहोत, काय खरे ? अन काय खोटे ? सगळ्यांनाच कळते... बऱ्याचदा दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते. पोलिसांना काय तक्रारदार नीतिमूल्यं हरविलेले असल्यानंतर त्यांनाही नोकरी करायची आहे, प्रबोधन करता येत नाही. नाही तर उद्या त्यांच्यावर सेटिंग झाल्याचा आरोप होईल. अन तसे पण पोलिसांच्या भूमिका आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आपल्या देशात कोटीच्या घरात न्यायालयात खटले पडून आहेत. न्याय मागणाराला न्याय वेळेत मिळत नाही म्हणून हैदराबादमध्ये चक्क पोलिसांनीच कोर्ट चालविले आणि शिक्षाही दिली. वेळेनुसार ते रामबाण इंजेक्शन या समाजातील अपप्रवृतींना ठरेल पण कायद्याने तो वादग्रस्त प्रश्न आहे. कारण या देशात लोकशाही नांदते आहे. पण न्याय देण्यासाठी कधी कधी पोलिसांनी चौकटीबाहेर जाऊन न्याय देणे गरजेचे आहे. पोलिसांची कार्यपद्धती बदलली एखाद्या गुन्ह्यात ज्यात केवळ वैमनस्य लपलेले आहे. अशात न्यायालयाने पुरावे तपासण्यापूर्वीच पोलिसांनी पुरावे तपासावे आणि केस दाखल करावी तर बराच कामाचा बोजा हा राज्यात आणि देशात न्यायालयाच्या डोक्यावरील कमी होईल, पण तपासणी निष्पक्ष होणे गरजेचे आहे. तेव्हा न्याय मागणे आणि देणे हे खरेच सोपे असते पण कायद्याच्या प्रक्रियांमुळे विलंब होतो. तेव्हा न्यायची अपेक्षा सर्वसामान्य माणसाची काहीच नसते. पोलिसांनी त्यांची बाजू जरी मांडली तरीही सर्वसामान्य खुश असतात. पण बाजू ऐकण्याची मानसिकता असणे गरजेचे आहे. शेवटी प्रश्न आहे तो नीतिमूल्याचा आणि नैतिकतेचा...!