मनसेचे ५ मार्च रोजी एकदिवसीय उपोषण
ठाणे : प्रभाग क्रमांक ७, साईनाथनगरमधील ४० मीटर डिपी रोडसाठी आरक्षित जागेवरील मुंबई महानगरपालिकेने आपली जुनी पाईप लाईन काढून टाकल्याने रिकाम्या झालेल्या जागेत अनधिकृत झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्या झोपड्या त्वरित हटवून बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ५ मार्च रोजी प्रभाग समिती कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. साईनाथनगरमध्ये ४० मीटर डिपी रोडचे आरक्षण आहे. त्याजागी मुंबई महानगरपालिकेची जुनी पाईप लाईन होती, ती बंद असल्याने त्यांनी काढून टाकलि आहे, पाईप लाईन काढून टाकल्याने मोकळ्या झालेल्या साईनाथनगरमधील दर्गा देवी मंदिरासमोर उजव्या व डाव्या बाजूस पत्र्याच्या १० झोपडया बांधण्यात आल्या आहेत. त्याच्या बाजूस महावितरणची चालू स्थितीत असलेली विद्युत डीपी आहे. विद्युत प्रवाहामुळे आजूबाजूस राहणाऱ्या नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे दररोज भांडणं होत असून आजूबाजूस राहणाऱ्या नागरीकास खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्ता व्यापला गेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच त्या झोपड्यांना कर सुदधा आकारला आहे. याची तक्रार यापूर्वी वर्तकनगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्याकडे २७ जानेवारी २०२० रोजी तक्रार केली होती. परंतु अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे हे बांधकाम निष्काशित करावे, संबंधित व्यक्तीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि वर्तकनगर प्रभाग समितीमधील कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर शिंदे यांच्यावर कर्तव्य पालनात कसूर केल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्थानिक नागरीक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप विभाग अध्यक्ष निखिल जाधव, उप शाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर, गट अध्यक्ष सुनील राजगुरू, कृष्णा काटमे हे स्थानिक नागरिकांसह ५ मार्च रोजी वर्तकनगर प्रभाग समितीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.