शासनाचे स्वामित्वधन जमा केले नाही?
- मुख्यमंत्री टीम
: ठाणे महानगरपालिकेने जुने ठाणे, नवीन ठाणे थीम पार्क पातलीपाडा घोडबंदर रोड येथे विकसित केले आहे. सदर काम करणारे ठेकेदार एनडीएस आर्ट वर्ड प्रा. लि. कंपनी यांनी शासनाची करोडो रुपयांची स्वामित्वधन (रॉयल्टी) दिली नसल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष विशाल जाधव यांनी महसूल विभागाकडे केली होती. त्यानुसार अधिक पाटील, तहसीलदार, ठाणे यांनी नगर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना दोन पत्रे पाठवली असतानाही त्याचे कोणतेही उत्तर आजपर्यंत त्यांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या थिमपार्कमध्ये अजून एक घोटाळ्याची वाढ झाल्याची पालिकेत चर्चा चालू आहे.
तक्रारदार विशाल जाधव यांनी दिनांक १५ मार्च २०१९ रोजी तहसीलदार, ठाणे यांच्याकडे जुने ठाणे, नवीन ठाणे थिमपार्कच्या कामाबाबत ठेकेदाराने शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत उत्खनन करून शासनाचे कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी चुकवली असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अधिक पाटील, तहसीलदार, ठाणे यांनी नगर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठामपा, ठाणे यांच्याकडे दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी व दिनांक ३१/०१/२०२० रोजी पत्र पाठवून याबाबतच्या माहितीची विचारणा केलेली होती. मात्र याबाबत तहसीलदार कार्यालयाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आजपर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. यापूर्वीही या कामाबद्दल महासभेमध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला होता. या कामातील अनियमितता व भ्रष्टाचाराबाबत चौकशी समितीही नेमली होती. मात्र त्यामध्ये गौण खनिज संदर्भातील मुद्दा दर्लक्षित करण्यात आलेला होता, ज्याकडे तक्रारदार विशाल जाधव यांनी लक्ष वेधले असून संबंधित ठेकेदाराने शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान केले असल्याचे त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलेले आहे. याबाबत त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता आजपर्यंत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसेच त्यांनी केलेल्या अपिलिय माहिती अधिकारावरही सुनावणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर प्रकरणांमध्ये शासन महसूल बुडविण्याचा प्रकार झाल्या असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.