साक्षात फिडेल कॅस्ट्रो

 



पहिलं पर्व जे आहे, तुम्हाला विश्वास वाटणार नाही. तो तरूणपणी ज्यावेळेस मला भेटला तेव्हा तो १५ की १६ वर्षांचा होता. त्यावेळी तो फिडेल कॅस्ट्रोसारखा दिसायचा. असे पिंजारलेले केस असायचे त्याचे. वागायचा पण तसाच. तो फिडेल कॅस्टो आठवा जरा. आता त्याचं छप्पर बरंच साफ झालंय जरा. परंतु तेव्हा जो फिडेल कॅस्ट्रोसारखा होता. आणि तो संतप्तपणा असा सगळा चेहर्या वर असायचा. आणि त्या मल्हार टॉकीजच्या बाजूच्या (सांगायला हरकत नाही ना कैलाश?) फुटपाथवर एक ऑफीस होतं पत्र्याच्या शेडमध्ये. त्या शेडमध्ये तो रहायचा. तिथेच जेवायचा. बर्याचि वेळा उपाशीपोटी रहायचा. ते कष्ट त्याने सोसलेले आहेत. पत्रकार रस्त्यावर येऊन जनतेचे प्रश्न सोडवतो. हा माणूस रस्त्यावरून पत्रकार झालेला पहिला माणूस आहे. आता मी पाहतो, ते वार्ताहर स्वत:ला पत्रकार समजतात. पत्रकार स्वत:ला संपादक समजतात आणि संपादक राजकीय लोकांचे पी.ए. असतात. तर ह्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये एक दैनिक चालू करायचं... हे दैनिक चालू करणं फार महत्वाचं आहे. ह्याचं कारण असं आहे की, माणसं सावधपणे आधी त्रैमासिक सुरू करतात. ते चाललं तर चाललं मग मासिक सुरू करतात. मग पाक्षिक, साप्ताहिक... आणि मग जमलं, तर पुंजी वगैरे जमा झाली, तर मग दैनिक सुरू करतात. बरेचसे पत्रकार हे मोठ्या दैनिकात जाण्यासाठी तळमळत असतात. एकदा कुमार केतकर माझ्यासमोर होते. पुण्याला आणि मी स्टेजवर होतो. मला वाटलं लोकसत्ता! म्हणून मी म्हटलं लोकसत्ताचे संपादक समोर बसलेत. तर ते उठून म्हणाले, मी आता लोकमतला गेलोय म्हणून... आता हे जे उंबरठा बदलणारे पत्रकार असतात. त्यांना असं वाटतं, की आपण मोठ्या कुठल्यातरी दैनिकात गेलो म्हणजे आपली पत्रकारिता धसास लागेल, कसास लागेल. पण, आयुष्यभर पण केल्यानंतर, आयुष्यभर ज्याने प्रतिज्ञा केलेली आहे, की मी फक्त जिल्हा दैनिकंच चालवेन आणि १६ वर्ष ते सतत चालवून दाखवलं. आणि पुढेही अशाप्रकारचे त्याचे कुठलेही ध्येय नाहीत. तुम्ही कैलाश म्हापदीला ठाणे शहरात बघूच नका. तुम्ही त्याच्याबरोबर मोखाडा, वाडा, जव्हार, पालघर, डहाणू, तलासरी अशा ठिकाणी पहा. ही फार अभिमानाने बोलण्याची गोष्ट आहे की, भारतात जेवढे आदिवासी आहेत. त्यातले ३३ टक्के ठाणे जिल्ह्यात आहेत. हे म्हणजे आपल्याकडे फार मोठी झोपडपट्टी आहे. जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी - धारावी, असं सांगण्यासारखं आहे. पण तिथे जाऊन त्या तेहतीस टक्क्यांमध्ये काम करणं जे म्हणतात हे काम फक्त हा माणूस करू शकतो. हा तिकडे गेला, की संपूर्ण जमाव असा नुसता मागे असतो त्याच्या आणि हा जमाव कुठल्यातरी इच्छेमुळे त्याच्यामागे नसतो. ती तेवढी कामं त्याने केलेली आहेत. तुम्ही जाऊन बघा शाळा वगैरे बांधलेल्या आहेत त्याने तिकडे. तिथे संपूर्ण आदिवासी भागात कामे केलेली आहेत. ह्या कामाची पावती म्हणून तो पुरस्कार देताना पण मला फार महत्वाचं वाटतं. आमचा अशोक नायगांवकर चांगला म्हणतो, की वर्षाचे सगळे पुरस्कार गोळा करून कुणालातरी एकदा तिरस्कार पण द्यावा. म्हणजे ते ह्यावर्षीचा तिरस्कार ह्यांना देण्यात येत आहे आणि मगाशी मी बोलत होतो, तेव्हा साहेबराव ठाणगे म्हणाले, फार चढाओढ लागेल... मला द्या, मला द्या म्हणून. अशा प्रकारच्या सगळ्या वातावरणामध्ये पुरस्कार देणं पण कुणाला?.. की ज्या माणसाला खरोखर कामाची पार्श्वभूमी आहे, त्याला पुरस्कार द्यावा. ठाणे महानगपालिकेचे जेव्हा मी गौरव बघतो. ८४ लोकं ठाणे गौरव आणि ठाणे भूषण पुरस्कार जवळजवळ साडे अकरा. पुरस्कार पण असे असतात की, कुणी एखाद्या नगरसेवकाचा ड्रायव्हर, कोण लिफ्टवाला त्यांना ठाणे गौरव. मी त्यांना म्हटलं, जागतिक कीर्तीचा चित्रकार ज्याची चित्रे नॉर्वेमध्ये लागलेली आहेत, असा सुधीर पटवर्धन नावाचा चित्रकार ठाण्यात राहतो आणि तुम्हाला माहीत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली, त्यानिमित्ताने भारत सरकारने जे तिकीट काढलं त्या तिकिटावर ज्यांचं चित्र आहे, ते चित्रकार ठाण्यात राहतात. हे ठाण्यात माहिती नाही कुणाला. अशा प्रकाराच्या समाजाने वाळीत टाकलेल्या कलाकारांचं किंवा व्यवस्थेने वाळीत टाकलेल्या कलाकारांचं काम शोधून त्यांच्याकडे जाऊन ते पुरस्कार देण्याचं जे व्रत आहे ना, हे व्रत वाटेल तितकं सोपं नाहीय. _तुमच्या असं लक्षात येईल नाहीतर, पुरस्कारासाठी अर्ज मागवतात अर्ज. आपल्याकडे बरेचसे जातात. तशाप्रकारे आपल्याकडे शासनाचे सगळे पुरस्कार आहेत. म्हणजे आदर्श पुरस्कार असा कुणीतरी एककल्ली माणूस, हा लंगडा घोडा, हे वादळ, ही वन मॅन आर्मी, हा जनादेश नावाची गोष्ट करून ते सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरतं. एवढं करून त्याची कुठलीच वल्गना नाहीय, की मी आता भारतीय पुरस्कार देतोय, की मी आता महाराष्ट्रातला पुरस्कार देतोय. कैलाश जर एवढं सगळं करत असेल, तर केवळ ते हौस म्हणून कॉमन मॅनचं चित्र बाळगत नाहीय. आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला तो कॉमन मॅन आहे. हा सामान्य माणूस आणि त्याचं वय वाढत चाललंय हे सतत दिसतंय आपल्याला. ह्याची प्रतिकात्मक खूण म्हणून त्याने हे चित्र लावलेलं आहे. हे चित्र त्याने फॅशन म्हणून लावलेलं नाहीय. कैलाश खरोखरच स्वतः फुटपाथवर असल्यामुळे त्याला सगळं दुःख माहिती आहे. आणि ते दु:ख त्याने मांडलेलं आहे. तर असा हा लहानपणामध्ये असलेला फिडेल कॅस्ट्रो... दुसरं पर्व त्याचं गेलं ते महानगर, आज दिनांक, सामनामध्ये गेलं. महानगरमध्ये जाणं म्हणजे मार खाणं. महानगरमधला आमचा निखिल वागळे, त्याच्याबरोबर असलेला कपिल आणि ही सगळी मुलं आणि हा कैलाश, अनिल ठाणेकर वगैरे ठाण्यामधली बरीचशी फौज ही महानगरमध्ये होती. ज्यावेळी निखिलचं भाषण ठेवलं त्या एम. एच. हायस्कूलमध्ये. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेची मेजॉरिटी असल्यामुळे शिवसैनिकांनी ठरवलं, की ह्याला आता झोडायचा. मी निखिलला म्हटलं, एवढं जहाल बोलून कशाला त्रास करून घेतोस. तो बोलला, नाही मी बोलणार म्हणजे बोलणार. असे पत्रकार असतात लक्षात घ्या. निखिल बोलायचं ते बोलला. आता हे लोक निखिलला मारणार म्हटल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. ह्याला मार पडता कामा नये. नरेश म्हस्के हा माझा विद्यार्थी होता. अजूनही आहे. तेव्हा नरेश म्हस्केला मी म्हटलं, की हे बघ बाबा हात लावलास, तर फार वाईट होईल. कारण हे आपल्या ठाण्याच्या संस्कृतीला शोभणारं नाहीय. तुम्हाला काय करायचं असेल निखिल वागळेच, तर ते मुलुंडच्या चेक नाक्यानंतर करा. ठाण्यात करू नका. नरेश म्हस्के तसा माझा आज्ञाधारक विद्यार्थी.. त्याने तो माझा आदेश पाळला आणि निखिल वागळेना सुखरूप रवाना केलं. हे जे सगळं वातावरण आहे ना... आजकालचे पत्रकार असे जगतात का?... असा मोठा प्रश्न आहे. पेड पत्रकारिता नावाची संस्कृती... खरंतर विकृतीच म्हणायला हवीय ती. ती अलिकडे जोर धरते आहे. पत्रकारांच्या बाबतीत हे राजकारणी लोक एवढे जागरूकतेने छान वागतात. ते दिवाळीला पत्रकारांना नाही गिफ्ट देत. पत्रकारांच्या बायकांना गिफ्ट देतात. बघा हे केवढं मोठं राजकारण आहे, की ते गृहखात्याला खूश करतात म्हणजे पत्रकार आपोआपच गप्प बसतात. अशाप्रकारची पत्रकारिता आमच्या कैलाशने कधीही केली नाहीय. लक्षात घ्या, पत्रकारिता ही एक सुळावरची पोळी आहे आणि ती चालवणं याला जसं पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं लेखणीचंही आणता येत नाही. लेखणीचं सोंग जो आणतो, तेव्हा ती लेखणीच त्याला उघडी पाडते. कैलाशची जी भाषा आहे, त्याबातीत मी कितीतरी वेळा त्याला सल्ला दिलाय. म्हटलंय अरे, तुझापण दाभोलकर होईल केव्हातरी. मी महारावला पण जाताना सांगितलं. ज्ञानेश्वरा जरा जपून. जाशील ना नीट. कारण तो इतका जहाल बोललाय इथे. त्यामुळे इथे कुणीतरी असणारच... स ना त नी... एकूणच सध्याचं जे वातावरण आहे आणि हे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक वाईट होत चाललंय. टिळक आणि आगरकरांच्या काळात शत्रू समोर दिसत होता. आता मात्र शत्रू आपल्यातच आहे आणि आपल्यातच शत्रू असल्यामुळे त्याला टिपणं जे आहे. ते टिपणं अतशिय जिकरीचं आहे. ते काम जर हा माणूस करत असेल आणि नेटाने १५ वर्ष जर करत असेल, तर हे असंच अखंडपणे करण्याचं बळ त्याला मिळावं. कैलाश त्याच्या कामातूनच त्याच्या दैनिकाचं नाव सार्थक करणार आहे. जनादेश... हा कुठल्याही शासनाचा आदेश नाही. हा जनाचा आदेश आहे. हा जनाचा आदेश असल्यामुळे सातत्याने वेगवेगळी आणि अतुलनीय कामगिरी करणारी व्यक्तीमत्व पहायला मिळतात. मी कैलाशच्या कार्यक्रमात दरवर्षी येतो, कारण मी स्वार्थी आहे. कारण अशा व्यक्तीमत्वांच्या बाजूला बसायला मिळणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कैलाश या सगळ्या लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. वर्ष बदलत असलं, तरीही आजचा सूर्य आणि उद्याचा सूर्य यामध्ये फरक नाही. आजची परिस्थिती आणि उद्याची परिस्थिती यामध्ये फरक नाही. सूर्य एकवेळ उगवतो आणि मावळतो. पण, अखंड उगवणारा सूर्य म्हणजे पत्रकार असतो. - अशोक बागवे, ज्येष्ठ कवी